घराच्या दारातून थेट पोलिस ठाण्यात
काशिमिरा परिसरात स्वस्त दरात फ्लॅट मिळवून देतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 23 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी काशीगाव पोलिस ठाण्यात फ्लॅट मालक अनिल सिंग आणि ब्रोकर अमित शुक्ला यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दहिसर परिसरात राहणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीला मीरा रोड भागात स्वतःचा फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी एका नामांकित ऑनलाईन प्रॉपर्टी वेबसाइटवर शोध सुरू केला. शोधादरम्यान त्यांना काही फ्लॅट पसंत पडले. वेबसाइटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. शुक्लाने स्वतःला ब्रोकर म्हणून ओळख करून दिली.
advertisement
यानंतर शुक्लाने तक्रारदाराला मीरा रोड येथील एका इमारतीत फ्लॅट दाखवला. हा फ्लॅट अनिल सिंग यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. फ्लॅटचा सौदा 60 लाख रुपयांत ठरवण्यात आला. सुरुवातीला तक्रारदाराकडून 51 हजार रुपये घेऊन करारनामा करण्यात आला.
यानंतर वेगवेगळ्या वेळेला रोख आणि ऑनलाईन पद्धतीने तक्रारदाराकडून एकूण 23 लाख 13 हजार रुपये घेतले गेले. मात्र बराच काळ लोटूनही फ्लॅटची मूळ कागदपत्रे देण्यात आली नाहीत. याबाबत विचारणा केल्यावर मालक आणि ब्रोकर दोघेही टाळाटाळ करू लागले.
अखेर या घटनेने संशय बळावला
संशय आल्याने तक्रारदाराने चौकशी केली असता हा फ्लॅट आधीच 65 लाख रुपयांच्या कर्जाखाली गहाण असल्याचे उघड झाले तसेच कर्जाची परतफेड न झाल्याने संबंधित बँकेने हा फ्लॅट एनपीए घोषित केल्याचे समोर आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने काशीगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
