खजूर हा नैसर्गिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. यामध्ये नैसर्गिक साखर – ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. विशेषतः कामाचा ताण, व्यायामानंतरचा थकवा किंवा उपवासाच्या वेळी खजूर खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. खजूरमध्ये फायबर म्हणजेच आहारातील तंतू मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते. नियमित प्रमाणात खजूर खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
advertisement
खजूरमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा यासारख्या समस्या कमी होतात. महिलांसाठी आणि वाढत्या वयातील मुलांसाठी खजूर विशेष लाभदायक आहे. पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास खजूर मदत करतो. तसेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही खजूर उपयुक्त ठरतो.
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील घातक घटकांशी लढा देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे वारंवार आजार होण्याचा धोका कमी होतो. मेंदूच्या आरोग्यासाठी देखील खजूर फायदेशीर आहे. स्मरणशक्ती वाढवणे, एकाग्रता सुधारणे आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी खजूर उपयोगी ठरतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या काळात खजूर आहारात घेतल्यास चांगला फायदा होतो.
आता प्रश्न येतो, खजूर किती प्रमाणात खावा?
तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दिवसाला 2 ते 4 खजूर खाणे पुरेसे असते. जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी खजूर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खजूर सकाळी उपाशीपोटी, दूधासोबत किंवा स्नॅक्स म्हणून घेता येतो. साखरेऐवजी खजूरचा वापर केल्यास तो शरीरासाठी अधिक सुरक्षित आणि लाभदायक ठरतो. योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास खजूर आपल्या शरीराला ऊर्जा, ताकद आणि संरक्षण देतो.





