हा प्रकार व्हीव्हीआयपी (VVIP) मूव्हमेंट सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या महिला पोलिसासोबत घडला आहे. एका महिलेनंच त्यांना ही शिवीगाळ केली आहे. आरोपी महिलेनं अश्लील शिवीगाळ करत, "तुझे कपडे फाटेपर्यंत मारेन," अशी धमकी दिली. या घटनेमुळे महिला पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
शनिवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास NSCI, मरीन ड्राईव्ह परिसरात राजकीय नेत्यांच्या हालचालींमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पोलीस वाहने हटवण्याचं काम करत होते. याचदरम्यान MH01 CD 8304 या क्रमांकाची एक कार रस्त्यात उभी असल्याने महिला पोलिसांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं.
advertisement
गाडी बाजूला घेण्याऐवजी कारमधून उतरलेल्या एका महिलेने थेट महिला पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. केवळ वादच नाही, तर या महिलेने अश्लील भाषेत शिवीगाळ करत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेने स्वतःला एका बड्या राजकीय नेत्याची नातेवाईक असल्याचे सांगत पोलिसांना धमकावले. "तुझे कपडे फाटेपर्यंत मारेन... तुझ्या बापाला फोन करू का?" अशा शब्दांत तिने महिला पोलिसांचा अपमान केला.
या घटनेनंतर पीडित महिला पोलीस तक्रार देण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने "ये सब रोज होता है यहाँ", असे म्हणून ही बाब झटकून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या या उदासीन भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
