बीडीडी रहिवाशांची मागणी मान्य
म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक असल्याने पात्र रहिवाशांना दरमहा घरभाडे दिले जाते. आतापर्यंत मंडळाकडून दरमहा 25 हजार रुपये घरभाडे दिले जात होते.
पुनर्विकासातील रहिवाशांचे आर्थिक गणित कोलमडले
advertisement
मात्र सद्यस्थितीत या परिसरात 25 हजार रुपयांत भाड्याचे घर मिळणे कठीण झाले आहे. घरभाड्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवाशांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता. त्यामुळे घरभाड्याची रक्कम वाढवून देण्याची मागणी रहिवाशांनी सातत्याने म्हाडाकडे केली होती.
दरमहा 30 हजार रुपयांचा निर्णय
या मागणीची दखल घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाने दरमहा घरभाडे 30 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर रहिवाशांना दरमहा 30 हजार रुपये घरभाडे देण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी काही रहिवाशांचे स्थलांतर संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये करण्यात आले होते. मात्र आता तेथे गाळे उपलब्ध नसल्याने उर्वरित पात्र रहिवाशांना घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
म्हाडाच्या या निर्णयाचे बीडीडी चाळीतील रहिवाशांनी स्वागत केले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून घरभाड्याच्या रकमेत कोणतीही वाढ झाली नव्हती. त्यामुळे ही वाढ रहिवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे
