मध्य रेल्वेवर 548, पश्चिम रेल्वेवर 165 नव्या लोकल सेवा
रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, पुढील पाच वर्षांत मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 548 नव्या लोकल सेवा, तर पश्चिम रेल्वेवर 165 लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे सध्या सर्वाधिक गर्दी असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, कुर्ला तसेच पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर ही सेवा वाढवण्यात येत असून, प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवास मिळणार आहे.
advertisement
कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार आणि क्षमतेत वाढ
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करणे, गर्दी नियंत्रित करणे आणि देशव्यापी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करण्यात येणार आहे. यासोबतच, गर्दीच्या स्थानकांवरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी झोन स्तरावर अल्पकालीन आणि मध्यम मुदतीची पावले उचलली जाणार आहेत. स्थानकांची क्षमता वाढवणे, वेळापत्रकात सुधारणा करणे आणि सेवा अधिक कार्यक्षम बनवणे यावर भर देण्यात येणार आहे.
या निर्णयांमुळे मुंबई लोकलमधील प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच, रोजच्या गर्दीचा त्रास काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






