BMC Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच पवारांच्या सेनापतीने शस्त्र टाकले, मुंबईत मोठी उलथापालथ
- Reported by:PRANALI KAPASE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
NCP SP Rakhi Jadhav :ठाकरे गटासोबतच्या आघाडीत कमी जागा मिळाल्यानंतर रविवारी रात्री काहींनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटासोबतच्या आघाडीत कमी जागा मिळाल्यानंतर रविवारी रात्री काहींनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राखी जाधव भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधीच मोठी घडामोड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मुंबईत मोठा धक्का बसणार आहे. पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव या भाजपात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेत आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय न मिळाल्याने राखी जाधव नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. विशेषतः घाटकोपरसारख्या महत्त्वाच्या भागात पक्षाची भूमिका कमकुवत ठरल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. याच असंतोषाचा परिपाक म्हणून राखी जाधव यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
advertisement
राखी जाधव या मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रमुख चेहरा मानल्या जात होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घाटकोपर परिसरात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे घाटकोपरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा बुरुजच कोसळल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राखी जाधव यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, त्यांच्या हालचालींमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीकडे भाजपसाठी हा प्रवेश मुंबईतील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
advertisement
राखी जाधवांच्या सूचनेवरून राष्ट्रवादीत आउटगोईंग?
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीत अपेक्षित जागा न मिळाल्याने राखी जाधव यांनीच पक्षातील काही इच्छुक उमेदवारांना अजित पवार गटात प्रवेश करण्याची सूचना केली होती, अशीदेखील चर्चा सुरू आहे. आता राखी जाधव या थेट भाजपात प्रवेश करणार असल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची ठाकरे बंधू सोबत युती झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि राखी जाधव यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे युतीकडून 10 जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने किमान २२ जागांची मागणी केली होती. मात्र, कमी जागा देण्यात आल्याने राष्ट्रवादी पवार गटात नाराजी पसरली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच पवारांच्या सेनापतीने शस्त्र टाकले, मुंबईत मोठी उलथापालथ









