मुंबई : मुंबईतील दहिसर परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच सावत्र बापाने वारंवार विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आलेली आहे.
पीडित मुलगी दहिसर परिसरात राहते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून तिचा सावत्र बाप तिच्याशी जाणूनबुजून जवळीक साधत होता. तो तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. यामध्ये तिला मिठी मारणे, तिच्या छातीला अश्लील स्पर्श करणे अशा घृणास्पद कृत्यांचा समावेश होता. हा घृणास्पद प्रकार गेले अनेक दिवस सुरू होता.
advertisement
या प्रकारामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली होती. घरातच हा प्रकार घडत असल्याने आणि समाजात बदनामी होईल या भीतीने तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही आणि ती गप्प राहिली.
मात्र दोन दिवसांपूर्वी नराधम बापाने पुन्हा एकदा तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मात्र, घाबरलेल्या मुलीने अखेर दहिसर पोलीस स्टेशन गाठले. तिने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि सावत्र बापाविरुद्ध तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिसर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली. त्यांनी आरोपी सावत्र बापाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. टकेनंतर आरोपीला दिंडोशी येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे..
