नेमकं काय झालं?
कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीत राहणाऱ्या अब्दुल रहमानचा सोमवारी 21 वा वाढदिवस होता. रात्रीचे 12 वाजण्याच्या सुमारास त्याचे पाच मित्र अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, आणि शरीफ़ शेख यांनी त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी खाली बोलावले. खाली केक कापल्यानंतर या मित्रांनी आधी अब्दुलवर अंडी आणि दगड फेकले. एवढंच नाही तर मित्राची मस्करी करताना असं काही केलं, की सर्वांना धक्का बसला.
advertisement
स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...
परंतु, यावरच न थांबता या पाचही जणांनी स्कूटीवर एका बाटलीतून आणलेला ज्वलनशील पदार्थ अब्दुलच्या अंगावर टाकला आणि त्याला आग लावली. अचानक आग लागल्याने अब्दुल रहमानने आपले कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यात तो गंभीररित्या भाजला गेला. जखमी झालेल्या अब्दुलला तातडीने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
एफआयआर दाखल
पीडित अब्दुल रहमानने केलेल्या तक्रारीनंतर विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान आणि शरीफ़ शेख या पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता च्या कलम 110 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम 3(5) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने या पाचही आरोपींना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
