मुंबई : महाराष्ट्रात आगीच्या घटनांची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर जिल्ह्यात शॉर्ट सर्किट किंवा इतर काही तांत्रिक अडचणींमुळे आगीच्या घटना घडत आहेत. अशातच कुर्ल्यात एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. कुर्ला परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वारंवार लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
कुर्ल्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी आग लागल्याने एकच गदारोळ माजला. ही आग एवढी भीषण होती की चार दुकाने जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनल दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रहिवांशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली. आगीनंतर परिसरातील लोकांची एकच धावाधाव झाली.
पहिली घटना दुपारी पावणे दोन वाजता
पहिली घटना दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी मुंबई उपनगरातील कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर येथील जुने गटार बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने तोडण्यात येत होते. त्याच वेळी येथील गॅस वाहिनी फुटली. त्यानंतर काही क्षणातच आगीचा भडका उडाला. ही बाब येथील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुकानाबाहेर धाव घेतली आणि पोलीस, अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग पूर्णपणे विझवण्यापूर्वी चार दुकानं जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी राहिवासी इमारत होती. या इमारतीला आग लागण्याची शक्यता होती, म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाने येथील रहिवाशांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवले. परिणामी कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, दुकानांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
दुसरी घटना 5 वाजता
कुर्ल्यातील कोहिनूर सिटी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबई अग्निशमन दलाने ही आग वर्ग II मोठी आगीची घटना असल्याचे घोषित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफिने आगीवर नियंत्रण मिळवत आग वरिल मजल्यांवर पसरण्यापासून रोखली. सुदैवाने या घटनेतही कोणीही जखमी झाले नाही.
