कर्जत यार्डचे आधुनिकीकरण करताना जुनी कार्यरत इलेक्ट्रिकल सिग्नलिंग प्रणाली पूर्णपणे बदलण्यात आली आहे. त्याच्या जागी नवीन अत्याधुनिक डिजिटल प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीची मानवी हस्तक्षेपाची गरज संपली असून सिग्नल बदलण्याचा वेळ वाचला आहे. नवी प्रणाली संगणक आधारित असून ती गाड्यांना रिअल-टाईममध्ये ट्रॅक करते. तसेच सिग्नल बदलणे आणि ट्रॅकचे व्यवस्थापन देखील आपोआप नियंत्रित केले जाते.
advertisement
कर्जत-पलसदरीला चौथी मार्गिका
कर्जत यार्ड आधुनिकीकरणात आणखी एक महत्त्वाचा भाग हा कर्जत आणि पलसदरी दरम्यान चौथी मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या नव्या लाईनमुळे प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे वेगळी केली जाईल. आधी मालगाड्या आणि प्रवासी गाड्या एकाच मार्गावरून धावत होत्या. त्यामुळे त्यांना सिग्नलवर थांबावे लागत होते. गाड्यांची गर्दी झाल्याने काही वेळा वाहतूक मंदावत होती. आता मालगाड्यांची वाहतूक वेगळी करण्यात येईल. त्यामुळे प्रवासी गाड्यांचा प्रवास वेळेवर होईल.
कर्जत यार्डमध्ये विविध सुधारणा केल्याने यार्डची एकूण क्षमता तब्बल 25 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे पनवेलहून येणाऱ्या मालगाड्यांचे रिसेप्शन आता मुख्य लाईन्स ओलांडल्याशिवाय करता येणार आहे. यामुळे वाहतुकीचा प्रवाह कायम राहणार असून गाड्यांना थांबावे लागणार नाही.
दरम्यान, कर्जत यार्डमध्ये विविध विकास कामांसोबतच आठ पूलांचा विस्तार करण्यात येतोय. यातील दोन फूटओव्हर ब्रिजचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच खंडाळ्यातील नव्या फूटओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
