मुंबईत कोचीसारखी जलमेट्रो सेवा सुरू होणार?
इंडियन मर्चेंट चेंबर तर्फे आयोजित कार्यक्रमात अश्विनी भिडे बोलत होत्या. या वेळी चेंबरच्या अध्यक्षा सुनीता रामनाथकर यांनी भिडे यांचे स्वागत केले. तसेच भिडे यांच्या हस्ते मुंबई पर्यावरण सप्ताहाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.
भिडे म्हणाल्या की, महाराष्ट्र सागरी मंडळाने जलमेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. कोची येथे जलमेट्रो प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे, त्या प्रकल्पात काम केलेल्या कोची शिपयार्ड कंपनीकडून मुंबईसाठी जलमेट्रोचा अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम दिले आहे. सध्या वाहतुकीसाठी नवे आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधले जात आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर गांभीर्याने विचार सुरू आहे.
advertisement
भुयारी मेट्रोतील नेटवर्कची समस्या संपणार
भुयारी मेट्रोमध्ये मोबाईल नेटवर्क न मिळण्याची अडचण लवकरच संपणार आहे. सर्व मेट्रो मार्गांमध्ये 5जी नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी विविध दूरसंचार कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. भारत संचार निगम लिमिटेडलाही याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनाही पत्र पाठवले असून, लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय मिळेल, असा विश्वास भिडे यांनी व्यक्त केला.
सध्या तिकिट खिडकी भागात वायफाय सेवा उपलब्ध आहे. आता ही सुविधा मेट्रो फलाटावरही देण्याची योजना सुरू आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर चालण्यासाठी योग्य चालण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा होणार आहे.
भिडे यांनी पुढे सांगितले की, मेट्रो स्थानकांवरून इतर भागात प्रवास सोपा व्हावा, यासाठी बेस्ट बससेवा जोडण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या बेस्टकडे सुमारे 2,500 गाड्या आहेत, पण काही वर्षांपूर्वी ही संख्या 4,500 होती. मुंबईसाठी किमान 10,000 बसेसची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात बसगाड्यांची संख्या वाढवण्याचे काम सुरू आहे.
