म्हाडाच्या घराची प्रतीक्षा संपणार
मुंबई मंडळाने यावेळी सुमारे 125 रिक्त घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ताडदेव, वडाळा, तुंगा पवई आणि इतर भागातील अनेक घरे अनेक वेळा सोडतीत न विकल्याने रिकामी होती. या रिक्त घरांवर देखभाल खर्च वाढत असल्याने ही घरे आता सोप्या प्रक्रियेतून थेट विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यातील बहूतेक घर ही मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील आहेत. सध्या या घरांच्या नव्या किंमती ठरवण्याचे काम सुरू आहे. किंमती अंतिम झाल्यानंतर जाहिरात जाहीर केली जाणार आहे.
advertisement
फक्त 'दोन' कागदपत्रांवर मिळणार म्हाडाचे घर
योजनेतील सर्वात मोठा बदल म्हणजे अनेक कठोर अटी रद्द केल्या आहेत. यापूर्वी म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला, आयकर विवरणपत्र, निवासी दाखला, विविध प्रमाणपत्रे अशी मोठी यादी होती. पण या योजनेत उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली असून, अर्जदाराच्या नावावर कुठेही घर असले तरी चालणार आहे. म्हणजेच पूर्वीप्रमाणे पहिलं घर ही अट राहणार नाही. फक्त आधार आणि पॅन सादर करून इच्छुक व्यक्ती अर्ज करू शकतो.
मात्र सामाजिक आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. मुंबई मंडळाचे अधिकारी सांगतात की ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी, जलद आणि सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. नवीन जाहिरात जाहीर झाल्यानंतर नागरिकांना थेट ऑनलाइन नोंदणी करून या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना परवडणारे आणि सुरक्षित घर मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे.
