मालमत्ता करासंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आज 25 मार्च रोजी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी डॉ. जोशी बोलत होत्या. सहायक आयुक्त करनिर्धारण व संकलन डॉ. गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळीय उपकरनिर्धारक आणि संकलक तसेच सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक करनिर्धारक व संकलक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत आतापर्यंत संकलित झालेला मालमत्ता कर आणि थकबाकीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. दरम्यान, मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी आणि साप्ताहिक सुटीच्या दिवशी देखील नागरी सुविधा केंद्र सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
डॉ. अश्विनी जोशी पुढे म्हणाल्या की, दिनांक 24 मार्च 2026 पर्यंत एकूण 6 हजार 449 कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या 87.86 टक्के इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. मालमत्ताधारकांनी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत करभरणा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी दिनांक 31 मार्च 2026 पूर्वी करभरणा करून दंडात्मक कारवाई टाळावी.
तथापि, मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी आणि साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे दिनांक 26, 28 आणि 29 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत तसेच दिनांक 30 आणि 31 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सीएफसी सुरू राहतील, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
