मुंबई-नागपूर दरम्यान धावणारी विशेष रेल्वे 6 तास उशिरानेही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मध्ये न पोहोचल्याने प्रवाशांनी स्टेशनवर जोरदार गोंधळ घातला. मध्यरात्री 12 वाजता येणारी ही ट्रेन सकाळी 6 वाजेपर्यंतही न आल्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.
रेल्वे प्रशासनाचा चालकाशी संपर्कच नाही
या विलंबामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून चालकाशी संपर्कच होत नसल्याचे कारण देण्यात आल्याने प्रवाशांचा संताप आणखी वाढला.या घटनेमुळे सकाळी 6 वाजता सीएसएमटीहून निघणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसलाही थांबवण्याचा पवित्रा प्रवाशांनी घेतला.
advertisement
जोपर्यंत विशेष ट्रेन येत नाही, तोपर्यंत गीतांजली एक्सप्रेसला जाऊ देणार नाही, असा इशारा देत प्रवाशांनी रेल रोकोची तयारी केली. या गोंधळामुळे सीएसएमटी स्टेशनवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवाशांची गैरसोय पाहता, रेल्वे प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणपती आणि दिवाळीच्या निमित्ताने हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू केल्या जातात. मात्र या ट्रेन नियमित वेळेपेक्षा खूप जास्त उशिरा पोहोचतात, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. यावेळी मात्र हद्दच झाली, तब्बल 6 तासांपेक्षा जास्त ही ट्रेन रखडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे.
