मुंबई: मुंबई एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच कांदिवली परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. कांदिवलीमध्ये भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर बेछुट गोळीबार केला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहेय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. फ्रेडी डिलिमा असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. फ्रेडी डिलिमा हा समाजसेवक असल्याचं सांगितलं जात आहे. कांदिवली पश्चिमेकडील हिंदुस्तान नाकाजवळ एका दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी फ्रेडी डिलिमा यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोराने फ्रेडी यांच्यावर दोन राऊंड फायर केलं. या गोळीबारात फ्रेडी यांच्या पोटात गोळी लागली.
advertisement
स्थानिकांनी धाव घेऊन घटनेची माहिती पोलिसांनी दिली. फ्रेडी डिलिमा यांना कांदिवलीतील ऑस्कर रुग्णालयात दाखल केलं. सध्या उपचार सुरू आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. एकूण ३ हल्लेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. फादर सुसाई इंग्लिश स्कूलजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी अचानक फ्रेडी नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला.
गोळीबारात जखमी झाल्यानंतर फ्रेडी स्वत: रुग्णालयात दाखल झाला होता. फ्रेडी डिलिमा हा इस्टेट एजंट म्हणून काम करत होता. मात्र, फ्रेडी डिलिमा यांच्यावर गोळीबार कुणी आणि का केला, याचे कारण अद्याप समोर आलं नाही. हल्लेखोराला पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोर तरुणाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास चारकोप पोलिसांकडून केला जात आहे.
