काल दुपारी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावरून एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा चालली होती. अंत्ययात्रा घेऊन जाणारे लोक रेल्वे प्रवाशांच्या गर्दीतून रेल्वे ओव्हर ब्रिजकडे चालले होते. पुलावर असलेल्या एका लांबलचक खांबामुळे अंत्ययात्रा घेऊन चाललेल्या नागरिकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली. ब्रिजवरील पायऱ्या चढताना, रेल्वे प्रवाशांतून मार्ग काढत पुढे जाताना आणि पुढे कब्रस्तान पर्यंत गर्दीतून रस्ता काढत जाताना नक्कीच सर्वांच्या नाकात दम आला. अनेक लोकं अशाच पद्धतीने मार्ग काढत आपल्या नातेवाईकाची अंत्ययात्रा काढतात.
advertisement
कुर्ल्यामध्ये पूर्वेकडून पश्चिमेला असणाऱ्या कब्रस्तानात जाणाऱ्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची संख्या होती. ही अंत्ययात्रा प्लॅटफॉर्मवरील पादचारी पूल चढून न्यावी लागत असल्याने खांदेकऱ्यांना ते पार्थिव तिरकं करावं लागतं आणि आडव्या अवस्थेत मृतदेह उचलून द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा हा मृतदेह त्या जनाजावरुन खाली पडण्याची देखील भीती असते. त्यामुळे जर एखाद्या वेळी हा मृतदेह जनजावरुन खाली पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. सेल कॉलनी, नेहरू नगर, ठक्कर बापा कॉलनी, कसाई वाडा, कुरेशी नगर आणि चुना भट्टी येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांची "अंत्ययात्रा" इतक्या विचित्र पद्धतीनेच नेतात.
प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहे. ही गोष्ट आत्ताची नसून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक इतक्या विचित्र पद्धतीनेच आपल्या नातेवाईकांची अंत्ययात्रा नेत आहेत. कुर्ला पूर्वेतील रहिवाश्यांनी प्रतिक्रिया दिली की, "स्मशानभूमी आणि निवासी क्षेत्रादरम्यान एक रेल्वे ट्रॅक आहे. पूर्वी, लोक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी त्यावरूनच जात असत. नंतर, रेल्वेने भिंत बांधून तो रस्ता बंद केला. तेव्हापासून, ही अडचण प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनली आहे." पुलासाठी निधी मंजूर झाला आहे, परंतु रेल्वे आणि बीएमसी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्याचे बांधकाम रखडले आहे. शेख वाजिद पानसरे यांच्या शब्दात सांगायचे तर, "या भागातील घाणेरड्या राजकारणामुळे पुलाचे काम रखडले आहे."
"ओव्हरब्रिज बांधण्यासाठी रेल्वेला 23 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. कामाचे आदेश देण्यात आले आहेत. ओव्हरब्रिजच्या डिझाइनमध्ये काही बदल केले जात आहेत. दोन महिन्यांत काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे. "रेल्वे पुलावरून अंत्यसंस्कार जातात, परंतु लोकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ओव्हरब्रिज बांधण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानग पालिकेची आहे. तेच या प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात.", अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे पीआरओ डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
