मुंबई महानगरपालिकेचा आगामी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. सलग तिसऱ्यांदा आयुक्त हे प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर पालिकेचे बजेट हे पायाभूत सुविधांवर भर देणारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या प्रभावाने साकार झाल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे बजेट सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकप्रिय घोषणा असण्याची शक्यता आहे.
advertisement
महापालिकेच्या मुदत ठेवीत होत असलेली घट आणि वाढत चाललेला अर्थसंकल्पाचा आकडा, त्यामुळे मुंबईकरांवर करवाढीचं सावट आहे. आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान 65 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प 59 हजार 954 कोटी रुपयांचा सादर करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते व वाहतूक प्रकल्पांसाठी 3 हजार 200 कोटी, त्याअगोदरच्या वर्षी 2 हजार 561 कोटी रुपये तरतूद होती. यंदा यात किती वाढ होणार याची उत्सुकता आहे.
सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा, तसेच गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणे, अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून याच मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्याशिवाय, विविध संघटनांनीदेखील मुंबईकरांसाठीच्या या मुद्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते.
गेल्या अर्थसंकल्पता महिला सुरक्षेसाठी अॅप, प्रदूषणकारी गाड्यांची विल्हेवाट यांसह महसूलवाढीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. या घोषणा कागदांवर राहिल्या आहेत. त्यामुळे जुन्या घोषणांना पुन्हा मुलामा देणारा अर्थसंकल्प ठरतो की, नव्या घोषणा केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
