मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लवकरच धावणार वाहने अडीच तासांत
या ब्रिजमुळे मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी जलद होणार असून एप्रिल 2026 पासून या मार्गावरचा प्रवास सुमारे 25 मिनिटांनी कमी होणार आहे. तयार होत असलेल्या या ब्रिजची उंची 182 मीटर असून याचे 94% काम पूर्ण झाले आहे. हा ब्रिज दोन मोठ्या डोंगरांदरम्यान बांधला जात आहे. त्यामुळे वाहनांना पूर्वीप्रमाणे मोठा वर्तुळाकार चक्कर मारुन पुढे जायची गरज राहणार नाही. वाहनचालक आता थेट 132 मीटर उंचीवरून एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर पोहोचू शकतील.
advertisement
एमएसआरडीसी हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे एक्सप्रेस-वेवरील एकूण अंतर 6 किमीने कमी होणार आहे. सध्या खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचे अंतर 19 किमी आहे. त्यात मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 13.3 किमी होईल.
यात प्रकल्पात बोगदे किती असतील?
या प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन केबल स्टेड ब्रिज असतील, एकूण 13.33 किमीपैकी 11 किमी बोगदे आणि सुमारे 2 किमी केबल ब्रिज असे काम आहे. दोन्ही केबल स्टेड ब्रिज साधारण 850 मीटर लांब आणि 26 मीटर रुंद असतील. बोगद्यांचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सिंक लिंकपेक्षा 55 मीटर उंच
हा नवीन ब्रिज बांद्रा-वरळी सी-लिंकपेक्षा 55 मीटर जास्त उंच असेल. सी-लिंकची उंची 128 मीटर आहे, तर मिसिंग लिंकचा केबल ब्रिज 182 मीटर उंच असेल. ब्रिजचे बांधकाम करण्यासाठी 182 मीटर उंचीचे चार टॉवर क्रेन वापरले जात आहेत.
दरम्यान या भागात वाऱ्याची तीव्रता नेहमीच जास्त असते, त्यामुळे ब्रिजचे डिझाइन खास तयार केले गेले आहे. या पुलावर 100 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवण्याची सुरक्षितता तपासून पाहण्यात आली असून ते टेस्टमध्ये पास झाले आहे.
काम उशिरा होण्याची मुख्य कारणे?
हा भाग डोंगराळ आणि हवामानावर अवलंबून आहे. जास्त उंचीवर तेज वारे, दाट धुके आणि पावसामुळे काम वारंवार थांबते. अनेक वेळा सकाळी इतके धुके असते की काही मीटर पुढेही दिसत नाही. त्यामुळे वर्कर्सना धुके कमी होण्याची वाट पाहावी लागते. मान्सूनमध्ये सलग पावसामुळे सुमारे चार महिने काम मोठ्या प्रमाणात मंदावले.
या साऱ्या अडचणींमध्ये कामगारांची सुरक्षा, उपकरणांची सुरक्षित हाताळणी आणि हवामानाशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम अपेक्षेपेक्षा हळू गतीने पुढे जात आहे. मात्र अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की उरलेले काम पुढील वर्षभरात पूर्ण होणार आहे आणि हा ब्रिज कार्यान्वित झाल्यावर मुंबई-पुणे प्रवास आणखी आरामदायी आणि जलद होईल.
