वांद्रेकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही कोंडी अधिक तीव्र स्वरुपाची होती. वांद्रे, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी या संपूर्ण पट्ट्यात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्रीचा अंधार पडत असताना रस्त्यावर लाल ब्रेक लाईट्सची भली मोठी रांग पाहायला मिळत होती. अखंड रांग झाल्यामुळे वाहनांची हालचाल सुद्धा जवळपास ठप्प झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका अग्निशमन दलाच्या गाडीला बसला होता. आपात्कालीन सेवांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
advertisement
खरंतर, वाकोला परिसरात आग लागल्याचा कॉल आल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली होती. मात्र, गाड्यांच्या लांबलचक लाईनीमध्ये ती गाडीही रस्त्यातच अडकून पडल्याची माहिती समोर आली. चौकाचौकांत पोलीस तैनात करण्यात आले होते आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते. ही घटना शहरातील वाहतूक व्यवस्थेतील मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली असून, दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजनांची गरज तीव्रपणे जाणवत आहे. ऐन पिक अवर्समध्येच वाहतूक कोंडी झाल्यामुळे चाकरमान्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
दरम्यान, अर्ध्या तासात पूर्ण होणारा वांद्रे ते जोगेश्वरी हा प्रवास आज वाहन चालकांना दीड ते दोन तासांत करावा लागला. कार्यालयातून सुटलेले चाकरमानी, खासगी वाहनधारक, तसेच सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासी या सर्वांनाच या कोंडीचा मोठा फटका बसला. उशिरा घरी पोहोचणे, मानसिक ताण आणि इंधनाची अतिरिक्त खपत यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
