गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात
अरुण गवळीची धाकटी कन्या योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर योगिता गवळी यांनी यासंबंधात घोषणा केली. भायखळा 207 प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचं योगिता गवळी यांनी जाहीर केलं आहे. या आधी अरुण गवळी यांची भावजय वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी पालिका निवडणूक लढविलेली आहे. अशातच आता धाकट्य़ा लेकीने देखील रिंगणात उडी मारलीये.
advertisement
योगिता गवळी यांनी सोशल मीडियावर काय लिहिलंय?
नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या”निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यामुळे आपल्या भायखळ्याच्या विकासासाठी मी योगिता अरुणभाई गवळी... आपल्या भायखळातील प्रभाग क्रमांक 207 या प्रभागातून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरत आहे. जसं 2004 साली आपण विधानसभेच्या निवडणूकीत डॅडीवर प्रेम केलेत आणि मतदानीरूपी आशीर्वाद दिलेत, त्याच आशीर्वादाची आता पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. डॅडींनी जी जनतेची कामे केली आणि सेवा केली तोच अजेंडा मी पुढे घेऊन जनतेची सेवा करण्याचा वारसा जपणार आहे, असं योगिता गवळी म्हणाल्या.
राजकारण न करता समाजकारणाचा कल
मी एक उमेदवार म्हणून नाही तर आपल्या भायखळ्याच्या प्रत्येक घरातील सदस्य म्हणून मला आपलं काम करायचे आहे. नगरसेवक हे एक पद म्हणून न बघता तर एक जबाबदारी म्हणून मी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करेन. राजकारण न करता समाजकारण करण्याचा हा आमच्या परिवाराचा नेहमीच कल राहिला आहे .
त्यामुळे आपण मला आपली सेवा करण्याची एक संधी द्याल जी आशा बाळगते, असं योगिता गवळी यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
