नेमका घोटाळा काय?
स्वस्तात घर देण्याची बतावणी करून वडाळा येथील गृहप्रकल्पात १०३ जणांची फसवणूक करण्यात आली आहे. बुकिंगच्या नावाखाली आरोपींनी या सर्वांकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. याप्रकरणी रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार, वडाळा पश्चिम येथील 'स्काय ३१' हा गृहनिर्माण प्रकल्प बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड उभारत असल्याची माहिती काहींना मिळाली होती. पुनर्विकासात तेथील रहिवाशांना घरे दिल्यानंतर विक्रीयोग्य घरे इतरांना दिली जात असल्याची जाहिरात करण्यात आली होती. कांदिवली येथील एका सीएने बुकिंगसाठी काही रक्कम दिली आणि बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत करार केला. या करारानुसार कन्स्ट्रक्शन कंपनीने घर दिले नाही. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यांच्याप्रमाणे अनेकांनी बुकिंगसाठी लाखो रुपये भरल्याचे कळले. फसवणूक झालेल्या अनेकांनी एकत्र येऊन बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्रीयोग्य घरांची माहिती घेतली असता संचालकांनी एक फ्लॅट अनेकांना विकल्याचे समोर आले. यानंतर सुमारे १०३ जणांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आल्यानंतर याबाबत रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
बिल्डरवर गुन्हा दाखल
या प्रकरणात कंपनीचे संचालक सुब्बरामन विलायनूर, उमा विलायनूर व इतर संचालक, बी. पी. गंगर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
