कॅब आणि रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद
गेल्या अनेक महिन्यांपासून कॅब आणि रिक्षाचालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने ओला, उबर आणि रॅपिडोला सरकारमान्य नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले असले तरी कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चालकांनी केला आहे. तरीही संबंधित कंपन्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
advertisement
किती दिवस चालणार संप? नागरिकांचा मोठा प्रश्न
देशात सुरू असलेल्या बेकायदा बाईक-टॅक्सी सेवा तसेच ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे धोरणाविरोधात शनिवारी (दि. 7) तारखेलाच फक्त राज्यभरातील कॅब आणि रिक्षाचालक एकदिवसीय बंद पुकारणार आहेत. हा बंद देशपातळीवर असल्याची माहिती भारतीय गिग कामगार मंचचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली आहे.
चालकांच्या नेमक्या समस्या काय?
बेकायदा बाईक-टॅक्सी सेवांमुळे मुंबईत अपघातांच्या घटना घडल्या असून काही नागरिकांना जीव गमवावा लागला तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. ही सेवा बेकायदा असल्याने अपघातग्रस्त प्रवाशांना विमा संरक्षण मिळत नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
याशिवाय पॅनिक बटणच्या नावाखाली कॅबचालकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आहे. केंद्र सरकार मान्यताप्राप्त असलेल्या अनेक पॅनिक बटण सेवा कंपन्यांना राज्य सरकारने अनधिकृत ठरवल्याने चालकांना जुनी उपकरणे काढून नवीन उपकरणे बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.
खुल्या रिक्षा परवाना धोरणामुळे रस्त्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त रिक्षा आल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न कमी झाले असून वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली आहे. या सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
