सुधाकर पाटोळे असं हत्या झालेल्या ३४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर अर्जुन विठ्ठल अडागळे आणि विधान मंडल असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. अर्जुन अडागळे हा माजी नगरसेवक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका माजी नगरसेवकाने अशाप्रकारे तरुणाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मयत सुधाकर पाटोळे (वय ३४) हा आरोपी अडागळे ज्या परिसरात राहतो. त्याच परिसरात तोही राहत होता. सुधाकर याने आपला मोबाइल चोरल्याचा संशय माजी नगरसेवक अर्जुन अडागळे याला होता. याच संशयातून अडागळे हा सुधाकरच्या शोधात होता आणि त्यासाठी त्याने विधान मंडल याला माहिती देण्यास सांगितले होते.
advertisement
गुरुवारी सकाळी सुधाकर पाटोळे हा एका रिक्षात झोपलेला विधान मंडल याच्या निदर्शनास आला. त्याने लागलीच ही माहिती अर्जुन अडागळे याला दिली. यानंतर अर्जुन अडागळे आणि विधान मंडल या दोघांनी मिळून सुधाकरला गाठले आणि त्याला जबर मारहाण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी सुधाकरला तुर्भे स्टोअर्स येथील सार्वजनिक शौचालयाच्या वरच्या खोलीत डांबून ठेवले आणि त्याला चार ते पाच तास बेदम मारहाण केली होती.
उपचारादरम्यान मृत्यू
मारहाणीत गंभीर जखमी झालेला सुधाकर नंतर सार्वजनिक शौचालयाजवळ जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
माजी नगरसेवकासह साथीदाराला कोठडी
या घटनेमुळे तुर्भे स्टोअर्स परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तुर्भे पोलिसांनी तातडीने माजी नगरसेवक अर्जुन अडागळे आणि विधान मंडल यांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाइल चोरीच्या केवळ संशयावरून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
