अली शेख असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. तर रितिका चौहान असं आत्महत्या करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती घाटकोपरमध्ये आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होती. मयत रितीका आणि अली शेख दोघंही अंधेरी येथील एका ऑफिसमध्ये काम करत होते. इथंच दोघांमध्ये मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण याच प्रेमाची किंमत तिने जीव देऊन मोजली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रितिका चौहान हिने ६ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून जीवन संपवलं. रितिकाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता, या आत्महत्येमागे तिच्या प्रियकराचा छळ असल्याचे उघड झाले आहे.
रितिका ही २०२३ पासून अंधेरी येथील एका फार्मा कंपनीत नोकरी करत होती. याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अली शेख याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. सहा महिन्यांपूर्वी रितिकाने अचानक नोकरीचा राजीनामा दिला. कुटुंबीयांनी विचारणा केली असता तिने काहीही सांगितले नाही, पण ती सतत मानसिक दडपणाखाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पैसे आणि अफेअरमुळे छळ
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी रितिकाला समजले की अली शेखचे तिच्याच कंपनीतील अन्य काही मुलींसोबतही अफेअर सुरू आहे. याच दरम्यान, अली शेख रितिकाकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. प्रियकराच्या मागणीनुसार, रितिकाने स्वतःच्या पी.एफ. (PF) खात्यातून काही रक्कम काढून अलीला दिली होती. या प्रकारानंतर त्यांचे प्रेमसंबंध तुटले आणि याच कारणामुळे रितिकाने पहिली नोकरी सोडली.
नोकरी सोडल्यानंतर महिनाभरापूर्वी रितिका विक्रोळीतील दुसऱ्या कंपनीत रुजू झाली, मात्र तिथेही अली शेख तिला त्रास देत होता. या प्रियकराच्या सततच्या मानसिक छळाला आणि फसवणुकीला कंटाळूनच रितिकाने अखेरीस आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी अली शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
