रोहित आर्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट
शुक्रवारी सायंकाळी उशिरा रोहित आर्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात रोहित आर्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतचा खुलासा समोर आला आहे. रोहित आर्याच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेल्याची जखम आढळली आहे. छातीत गोळी मारल्यानंतर ती थेट पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे त्याचा जीवंत राहण्याची काहीच संधी नव्हती. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे.
advertisement
शवविच्छेदन करण्यापूर्वी मृतदेहाचे एक्स-रे काढून घेण्यात आले. या प्रक्रियेचे व्हिडीओद्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे. रासायनिक परीक्षणासाठी मृतदेहातील व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला आहे. खरं तर, मृतदेहावर शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नातेवाईकांची आवश्यकता असते. रोहित आर्याच्या एन्काऊंटरनंतर २४ तासांहून अधिक काळ त्याचं कुटुंब संपर्कात नव्हतं. त्यामुळे त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आलं नव्हतं.
शुक्रवारी सायंकाळी कुटुंबीय पोहोचल्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनादरम्यान कुटुंबीयांची उपस्थिती महत्त्वाची असल्याने उशीर झाला होता.
नेमकं प्रकरण काय?
रोहित आर्या हे महाराष्ट्र सरकारसाठी काम करत होते. त्यांनी राज्य सरकारची 'स्वच्छता मॉनिटर' नावाचं अभियान चालवलं होतं. यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातील दोन कोटीहून अधिकची रक्कम खर्च केली होती. ही थकबाकी सरकारने द्यावी, यासाठी रोहित आर्या प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर त्यांनी मुंबईतील पवई भागातील एका स्टुडिओमध्ये लघुपटाच्या ऑडिशनच्या निमित्ताने राज्यभरातील मुलांना एकत्र बोलवलं.
याठिकाणी त्याने १७ अल्पवयीन मुलांची निवड करत सर्वांना स्टुडिओमध्ये बंदिस्त केलं. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पण अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवल्याने मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाकडून त्याचं एन्काऊंटर करण्यात आलं.
