जगदीश गौडा आणि धर्मेंद्र सोनकर असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन मुलींना वेगवेगळी आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवत होते. तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी अल्पवयीन मुलींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
नेमकं कसं चालायचं अल्पवयीन मुलींचं सेक्स रॅकेट?
घाटकोपर परिसरातील हॅाटेल गोल्डन पॅलेस येथे एक एजंट देहविक्रीसाठी ४ मुली घेऊन येणार आहे, अशी टीप घाटकोपर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचला आणि एजंट जगदीश गौडासह चार मुलींना ताब्यात घेतलं. पोलीसांनी गौडा आणि मुलीची आधारकार्ड तपासली असता, त्यांचे वय २३,२३ वर्षे असल्याचं नमूद होतं. मात्र पोलीसांना संशय आल्यामुळं त्यांनी मुलींची सखोल चौकशी केली. तसेच अन्य कागदपत्रे पडताळली तेव्हा पोलीसांना धक्का बसला. कारण त्या मुलींचं वय १२, १४ आणि १६ असं असल्याचं निष्पन्न झालं. या सर्व मुली मुळच्या राजस्थानच्या असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
पोलीसांनी गौडाची कसून चौकशी केली असता या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी गौडाचा आणखी एक साथीदार धर्मेंद्र सोनकरला अटक केली. दोघंही आरोपी अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना परराज्यातून आणून मुंबईतील विविध होटेल्समध्ये देहविक्री करायला भाग पाडत होते. पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या चार अल्पवयीन मुलींची मोठ्या शिताफीनं सुटका केली असून त्यांना बाल-महिला सुधारगृहात पाठवले आहे. या मुलींना बनावट आधारकार्ड कशाप्रकारे बनवून मिळाली? यात काही शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
