सायबर गुन्हेगारांचा नवा पॅटर्न
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजलाल बरनवाल (वय 65 वर्षे) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. 26 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला. स्वतःला सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवत आरोपींनी बरनवाल यांना गंभीर कायदेशीर कारवाईची भीती दाखवली.
आरोपींनी डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगून त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर ठेवले. कॉल दरम्यान त्यांना घराबाहेर न पडण्याचे, कोणाशीही संपर्क न साधण्याचे आदेश देण्यात आले. पैसे पडताळणीसाठी बँक खात्यातील रक्कम तपासणे आवश्यक असल्याचे सांगत ऑनलाईन व्यवहार करण्यास भाग पाडण्यात आले. सततच्या व्हिडिओ कॉलमुळे आणि धमक्यांमुळे बरनवाल मानसिक दबावाखाली आले.
advertisement
या दरम्यान विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून आरोपींनी 14 लाख रुपयांची फसवणूक केली. काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बरनवाल यांनी तात्काळ कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन किंवा व्हिडिओ कॉलवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
