शाहिस्ता मोहम्मद अमीन खान (वय २६) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सासरे मोहम्मद सईद खान आणि दीर मोहम्मद इरफान यांना अटक केली आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी पती मोहम्मद अमीन, सासू फातिमा खातून, नणंद हिना मोहम्मद इरफान खान यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
मयत शाहिस्ता ही मूळची पुण्याची रहिवासी आहे. सहा वर्षांपूर्वी तिचा विवाह मोहम्मद अमीन खान याच्याशी झाला होता. लग्नानंतर ती गोवंडी आणि नंतर मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड परिसरात राहायला आली. मात्र, लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरच तिचा सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली.
शाहिस्ताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सासरचे लोक तिच्याकडे सतत पैसे, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि घरातील सामनाची मागणी करत होते. इतकेच नव्हे तर, पुण्यात फ्लॅट घेण्यासाठीही तिच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. तिने पैसे आणण्यास नकार दिल्यास तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असे.
याशिवाय मानखुर्द येथे राहत असताना तिचा पती मोहम्मद अमीन तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो सौदीला कामासाठी गेल्यानंतरही तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या सततच्या संशयामुळे आणि छळामुळे शाहिस्ताला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने ५ डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. शाहिस्ताच्या वडिलांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
