मुंबई : नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गट आणि मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर शर्मिला ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून "मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतोय, तिकडे १८०० कोटींचा जमीन घोटाळा होतो गुन्हा दाखल होत नाही. मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते' असं प्रशासनाला ठणकावून सांगितलं.
advertisement
अमित ठाकरे नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा झाकलेला होता. पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धुळ साचली होती. हे पाहावलं गेलं नाही, त्यामुळे अमित ठाकरे यांनी पुतळ्यावरील आवरण बाजूला करून पुतळ्याचं अनावरण केलं. पण, या प्रकरणी नेरळ पोलिसांनी परवानगीशिवाय अनावरण तसंच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमवल्याचा आरोप करत अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणावर आई शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला.
मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते. पुतळ्यावर माती साचली होती. तिकडे १८०० कोटींचा जमीन घोटाळा होतो गुन्हा दाखल होत नाही. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजे. किल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत. तिथे आधी शासकीय पर्यटन सेंटर आहे. महाराजांचे किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे. पण, आम्ही हे होऊ देणार नाही. यांना निवडणुकीसाठी महाराज दिसतात. पंतप्रधान मोदी नवी मुंबईत येऊन गेले, पण त्यांना पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं हे दिसून आलंय, अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली.
'मागील ४ ते ५ महिन्यापासून पुतळ्याला झाकून ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी तर पालिकेकडून तिथे लायटिंगही लावली होती. राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या ब्लू प्रिंटमध्ये उल्लेख केला होता. राज्यातील किल्ल्यांच्याा विकासाचं काम झालं पाहिजे. पण, सरकारकडून कुठेही किल्ल्याचं दुरस्तीचं काम होतं नाही. उलट वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी होते. माहिमच्या किल्ल्यावर झोपडपट्टी आहे. तुम्ही सांगा हा किल्ला पाहिजे, तर रजिस्ट्रेशनकरून ते ताब्यातही घेतील, असा टोलाही शर्मिला ठाकरे यांनी लगावला.
'शिवसेनेला अजूनही न्याय नाही'
"आशिष शेलार यांनी त्यांच्या मतदारसंघात सुद्धा दुबार मतदार असल्याचं दाखवलं आहे. मग आता त्यांनी खरी आकडेवारी काढली पाहिजे. बिहार निवडणुकीची आकडेवारी तुम्हीच दाखवली आहे. ४.५० कोटी मतदार होतं आणि ७ कोटी मतदान झालं आहे. हे वरचं मतदान कुठून आलं आहे. आपण पाहतोय मुंबईतून, राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत. त्यांनी तिकडे मतदान केलं आणि इकडे मतदान करणार आहे. मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला हे दिसत नाही का? एवढंच नाहीतर शिवसेना कुणाची प्रकरणाची केस तीन वर्षांपासून कोर्टात लढत आहे. अजूनही या प्रकरणावर न्याय दिला जात नाही, त्यामुळे कुणाला काय बोलणार? असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
राज ठाकरे काय म्हणाले?
तर दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर घाणरेडा कापड हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पत्रकारांनी राज ठाकरेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फक्त स्मित हास्य केलं.
अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
'छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल याचा मला अभिमान आहे. महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्यात गुंडाळून ठेवला होता, त्याच्यावर प्रचंड धूळ बसली होती. मी कोणत्याही राजकीय स्वार्थापोटी नाही तर फक्त महाराजांसाठी आणि जनतेसाठी त्याचे अनावरण केले आहे. महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेल, असं अमित ठाकरे म्हणाले.
