सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर (रा. विक्रोळी पार्कसाईट) असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव आहे. ते विभागात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते.
गुरुवारी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाचाडकर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यासाठी आले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या सीजीएस कॉलनीमधून चालत जात असताना त्यांना अमन श्रीराम वर्मा (वय १९) या तरुणाचा धक्का लागला. धक्का लागण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झाले.
advertisement
यावेळी संतापलेल्या आरोपी अमन वर्मा याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्यात घातला. या वर्मी घावाने सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील पाचाडकर यांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सुरेंद्र पाचाडकर हे पार्कसाईट परिसरात एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखले जायचे. ते शिवजयंतीच्या कार्यक्रमात नेहमी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्ररथावर उभे राहात असत. याच कारणामुळे त्यांना त्यांचे सहकारी 'महाराज' या टोपणनावाने ओळखायचे. त्यांची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पाच तासांत आरोपी जेरबंद
हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि आरोपी अमन वर्मा याचा माग काढला. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांन अवघ्या पाच तासांमध्ये आरोपी अमन वर्मा याला रमाबाई कॉलनीतून अटक केली. चालताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
