पडद्याआड निवडणुकीत काँग्रेसचीच का फुटतात मतं? गेल्या अडीच वर्षांच्या काळात एकदाच नव्हे तर जवळपास 3 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांत काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटली आहेत. खरं पाहायला गेलं तर 2019 पासून राज्याच्या राजकारणात फोडाफोडीला चांगलाचं ऊत आला. या काळात विधानपरिषद आणि राज्यसभेच्या मतदानादरम्यान काँग्रेसमध्ये दगाबाजी झाल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. 2022 मध्ये याच कालावधीत विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती, काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना अधिकची मते तर भाई जगताप यांना अतिरिक्त मतांबरोबरच विजयाचे गणित जुळविण्यासाठी त्यांनी बाहेरून मते मिळवावीत, अशी व्यूहरचना होती. पण हंडोरे यांना दिलेली मतेच भाई जगताप यांच्याकडे गेली. परिणामी दुसऱ्या क्रमांकावरील जगताप निवडून आले तर हंडोरे पराभूत झाले.
advertisement
यंदा काँग्रेसची सहा ते सात मते फुटल्याचा संशय आहे. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 30 मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना पहिल्या पसंतीची पाच मते कमी पडली. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले तीन ते चार आमदारांची मते काँग्रेसने गृहित धरली नव्हती. याशिवाय दोन नेत्यांच्या घरातील मतांबाबत काँग्रेस नेत्यांना संशय होता. चार ते पाच मतांबाबत आम्हाला खात्री नव्हती. पण दोन अतिरिक्त मते फुटली ही बाब काँग्रेसने गांभीर्याने घेतली आहे.
महाविकास आघाडीला पराभवाच्या दरीत ढकलणारे काँग्रेसमधील विभीषण कोण?
कारवाई झाल्यास आमदारांना महायुतीचं अभय? फुटलेल्या आमदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. आता काँग्रेसने जर हे फुटीर आमदार कोण आहेत, हे शोधलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली तर नवल वाटायला नको. परंतु, त्याही पुढे काही आमदारांवर कारवाई झाली तर त्यांना महायुतीच्या नेत्यांनी अभय दिल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आमदारांना महायुतीकडून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
