काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक परदेशी तरुणी महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात फिरताना दिसत होती. यावेळी दोन तरुणांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संबंधित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण केवळ तिची छेड काढून थांबले नाहीत, तर तब्बल 15 मिनिटे तिचा पाठलाग करत होते. सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ते वारंवार तिच्या जवळ जाण्याचा आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. तरुणीने त्यांना वारंवार हटकले, विरोध केला, मात्र त्यांनी तिचे ऐकले नाही. अखेर या तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
advertisement
जागतिक स्तरावर उमटले पडसाद
हा व्हिडिओ केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. जागतिक स्तरावर मुंबईच्या सुरक्षिततेबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्याने पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलीस आयुक्त स्तरावरून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.
आगरीपाडा पोलिसांचा तपास
आरोपींची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आगरीपाडा पोलिसांनी तात्काळ विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान निष्पन्न झाले की, हे दोन्ही तरुण मूळचे बिहारचे असून मुंबईत मजुरी करण्यासाठी आले होते. त्यांच्या या एका कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची मान शरमेने खाली गेली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
धोबीघाट, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या पर्यटन स्थळांवर परदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईत पाहुण्यांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईद्वारे पोलिसांनी दिला आहे.
