मलनिस्सारण पाइपलाइनचे काम सुरू
वडाळ्यात महानगरपालिकेकडून मलनिस्सारण पाइपलाइन टप्पा क्रमांक 3 चे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम मोनोरेल पोल क्र.1 एल-322 उत्तर वाहिनी ते वडाळा डेपो मोनोरेल स्थानकादरम्यान करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 25 फूट परिघ आणि 20 फूट खोल उत्खनन केले जाणार असून, हे काम तांत्रिकदृष्ट्या मोठे आणि वेळखाऊ असल्याने वाहतुकीत बदल करणे आवश्यक ठरले आहे.
advertisement
काम सुरू असताना अपघात टाळण्यासाठी आणि काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी संबंधित परिसरात नियोजन करून सुरक्षा उपाययोजना आखल्या आहेत. कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, मार्गदर्शक फलक तसेच आवश्यक ते इशारे देण्यात येणार आहेत.
कोणते मार्ग बंद राहणार?
या पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी मध्यरात्री 12:01 वाजल्यापासून ते 22 मे रोजी मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत आरटीओ चौक ते वडाळा डेपो मोनोरेल स्थानकादरम्यानची उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत या मार्गावरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरटीओ चौक ते वडाळा मोनोरेल स्थानक हा प्रवास दक्षिण वाहिनीतून दुतर्फा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच वडाळा डेपो मोनोरेल स्थानकाजवळील मोकळ्या जागेतून वाहनांना पुन्हा मूळ उत्तर वाहिनीत प्रवेश करता येणार आहे. या बदलांमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.






