काही काळ वाट पाहिल्या नंतर रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सत्यमचे वडील संतोष दुबे यांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. सुरुवातीला हादरलेले संतोष यांनी नातेवाईकांशी चर्चा करून मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे सत्यमचे यकृत, दोन मूत्रपिंडे, डोळे आणि उती यांचे दान करण्यात आले. या दानामुळे तीन जणांना नवजीवन मिळाले आहे.
advertisement
Cancer Vaccine: लक्ष द्या! मुलींना मिळणार मोफत कर्करोग प्रतिबंधक लस, कधी आणि कुठं? संपूर्ण माहिती
45 वे मेंदूमृत अवयवदान
एमआरओटीओ (MROTO) च्या माहितीनुसार, हे मुंबई विभागातील चालू वर्षातील 45 वे मेंदूमृत अवयवदान ठरले आहे. राज्यभरात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच्या तुलनेत मेंदूमृत व्यक्तींकडून होणारे अवयवदान अत्यल्प आहे. त्यामुळे अशा प्रत्येक दानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
अवयव रुपानं मुलगा जिवंत
अवयवदानानंतर भावनिक होत संतोष दुबे म्हणाले, “माझा मुलगा आता शरीराने आपल्या सोबत नाही पण त्याचे अवयव इतरांच्या शरीरात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे तो अवयवरूपी जिवंत राहील. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकलो.”
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांत अवयव निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र अवयवदानाविषयी समाजात अजूनही अंधश्रद्धा आणि माहितीअभावी संकोच दिसतो. वेळेवर मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान झाले तर हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अवयवदानाच्या या घटनेने वसई परिसरात एक सकारात्मक संदेश दिला असून सत्यम दुबे यांचे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.






