Cancer Vaccine: लक्ष द्या! मुलींना मिळणार मोफत कर्करोग प्रतिबंधक लस, कधी आणि कुठं? संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Cancer Vaccine: सध्याच्या काळात महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
पुणे: गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून ग्रामीण भागातील 9 ते 14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘जीविका फाउंडेशन’ या संस्थेसोबत करार केला आहे. या उपक्रमाद्वारे मुलींमध्ये या गंभीर आजाराबाबत जागरूकता वाढविण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
9 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लस
ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेने सर्व्हायकलमुक्त पुणे हा सर्वसमावेशक आरोग्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने जीविका फाउंडेशन सोबत सामंजस्य करार केला असून, या करारावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जीविका फाउंडेशनचे संचालक जिग्नेश पटेल यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
advertisement
या उपक्रमांतर्गत 9 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस विनामूल्य दिली जाणार आहे. तसेच सर्व अविवाहित महिलांची तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमामुळे आजाराचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार करणे शक्य होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
advertisement
दिवाळीनंतर विशेष मोहीम
दिवाळीनंतर जिल्ह्यात ‘सर्व्हायकलमुक्त पुणे’ या आरोग्य उपक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस दिली जाणार आहे. ही लस पूर्णतः ऐच्छिक असणार असून, लसीकरणापूर्वी पालकांची संमती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींना मार्च 2026 पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साधारण 35 हजार मुली या वयोगटात आहेत. या सर्व मुलींना लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले असून, हा उपक्रम मुलींच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक प्रभावी पाऊल ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 24, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Cancer Vaccine: लक्ष द्या! मुलींना मिळणार मोफत कर्करोग प्रतिबंधक लस, कधी आणि कुठं? संपूर्ण माहिती


