महेश तपासे असं आरोपीचं नाव तो मूळचा पुणे जिल्ह्याच्या जुन्नर येथील रहिवासी आहे. त्याचे पीडित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दोघेही एकाच शाळेत शिकत होते. तेव्हापासून त्यांची मैत्री होती. मात्र काही वर्षांपूर्वी तरुणीचं लग्न झालं. तिला मुलंही झाली. यानंतर आरोपी महेश आणि पीडित महिला एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले.
advertisement
प्रेमासाठी संबधित महिलेनं आपल्या नवऱ्याला सोडलं. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर ती एकटी वाशीमध्ये राहत होती. मात्र ही चूक तिच्या जिवावर बेतली. पीडित महिला नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर आरोपीनं तिला स्विकारण्यास आणि मुलांना सांभाळण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. यानंतर आरोपी तिला सातत्याने शिवीगाळ करत होता.
प्रेमात मिळालेला धोका आणि आरोपीचा सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं जुलै महिन्यात राहत्या घरात उंदीर मारायचं औषध प्राशन केलं. १९ जुलै रोजी नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान, पोलिसांना मृत महिलेचा मोबाईल तिच्या पुण्यात राहणाऱ्या आईकडून मिळाला. तेव्हा मोबाईलमध्ये मयत महिला आणि आरोपी महेश तपासे यांच्यातील संभाषणांच्या अनेक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले. ज्यात तो पीडितेला शिवीगाळ करून छळ करत असल्याचं दिसून आलं. याच ऑडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी आरोपी महेश तापसेला अटक केली. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
