कच्छ, 13 सप्टेंबर : मागील आठवड्याच्या शेवटी राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे होतं. भारताने परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार अगदी शाही थाटात केला. त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून जेवणातील पदार्थांची चर्चा सर्वत्र झाली. या परिषदेच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी आपली कलादेखील सादर केली. जागतिक स्तरावर देशाची विविधता आणि संस्कृती त्यांना आपल्या कलेतून प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.
advertisement
ज्या ठिकाणी शिखर परिषद पार पडली, ते भारत मंडपम विविध शिल्पांनी सजवण्यात आलं होतं. येथील सजावट अक्षरश: डोळे दिपवणारी होती. यामध्ये गुजरातच्या कच्छ भागातील मडवर्क कलाकार माजी खान मुतवानी यांची कलादेखील सर्वांनी पाहिली. कच्छच्या बन्नी भागातील सिणीयारो गावचे रहिवासी असलेल्या माजी खान यांनी चक्क कच्छच्या मातीतून आपली कला सादर केली.
कच्छच्या काही गावांमध्ये जवळपास तीन शतकांपासून मातीची भांडी बनवण्याचं काम जोमात सुरू आहे. येथील लोक याच कामातून आपला उदरनिर्वाह करतात. भांड्यांसह मातीपासून शोभेच्या वस्तू, भिंतीवरील शो-पीस आणि इतर सजावटीच्या वस्तूदेखील इथे बनवल्या जातात. मुख्य म्हणजे इथल्या मातीच्या वस्तूंना देशभरातूनच नाही, तर विदेशातूनही मागणी असते. याठिकाणी फार पूर्वी मातीचं घरं बांधली जायची. घरात शोभेच्या वस्तूही मातीच्याच असायच्या. त्यातूनच ही कला जन्माला आली.
कुठे ट्रेन, कुठे एरोप्लेन...चक्क हवेतही जेवण, 'या' रेस्टॉरंट्समध्ये एकदातरी जा!
G20 परिषदेत शिल्पकार माजी खान यांनी मातीवर केलेलं सुबक नक्षीकाम पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी त्यांना कच्छमध्ये त्यांचं काम कसं सुरू आहे, याबाबत विचारणाही केली. तर, इतर देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधीदेखील ही कला पाहून आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, माजी खान हे मागील 10 वर्षांपासून या कलेशी जोडले गेले आहेत. ते बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. नोकरीतील एका सहकाऱ्याने त्यांना मडवर्क कलेबाबत माहिती दिली होती. आज ते या कलेत इतके पारंगत झाले आहेत की, त्यांची कला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. ते ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून आपण तयार केलेल्या वस्तूंची देश-विदेशात विक्री करतात. देशातील सुप्रसिद्ध शिल्पकारांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख होतो.
