बनावट बलात्कार प्रकरणाची धमकी देऊन कोट्यवधींची उगाही
पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंग्स आणि डिजिटल चॅट्सच्या आधारे असे समोर आले आहे की अंशिकाने बनावट बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी देत सुमारे दीडशेहून अधिक लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. पीडितांमध्ये केवळ सामान्य लोकच नाहीत, तर अयोध्येत कार्यरत असलेला एक सीओ (सर्कल ऑफिसर) तसेच गोरखपूर शहरातील किमान 15 पोलीस कर्मचारीही असल्याची माहिती आहे. बदनामीची भीती आणि कायदेशीर अडचणींच्या धाकामुळे अनेक जण तिच्या जाळ्यातून बाहेर पडू शकले नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
advertisement
मेसेंजरवरील व्हिडीओ कॉल ठरला ब्लॅकमेलिंगचं हत्यार
अंशिकाची कार्यपद्धती अत्यंत चालाख आणि योजनाबद्ध होती. ती आधी सोशल मीडिया मेसेंजरच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायची. हळूहळू विश्वास निर्माण केल्यानंतर ती व्हिडीओ कॉलवर संवाद साधत असे. या संभाषणादरम्यान समोरच्या व्यक्तीला भावनिक किंवा खासगी बोलण्यात गुंतवून त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असे. नंतर हीच रेकॉर्डिंग ब्लॅकमेलिंगसाठी वापरली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबात दरी वाढली
ग्रामीणांच्या माहितीनुसार, कोरोना काळात अंशिकाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर अंशिका आणि तिच्या कुटुंबीयांच्या हालचालींबाबत गावात चर्चा वाढू लागल्या. परिस्थिती इतकी बिकट झाली की गावकऱ्यांनी त्यांच्याशी सामाजिक संबंध तोडले आणि साधा संवादही टाळू लागले.
भावानेही नातं तोडलं
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील एकुलता एक मुलगा सुमारे तीन वर्षांपूर्वी लग्नानंतर गाव सोडून पुण्यात स्थायिक झाला. त्यानंतर त्याने कुटुंबाशी जवळपास सर्व संबंध तोडले. जेव्हा घरातलाच मुलगा विश्वास ठेवू शकला नाही, तेव्हा गावकऱ्यांनी तरी कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल गावात वारंवार केला जात असल्याचेही सांगितले जाते.
गावात आधीपासूनच संशयास्पद प्रतिमा
ग्रामीणांच्या मते अंशिका, तिची आई आणि एक बहीण यांच्याबाबत गावात बराच काळ संशय व्यक्त केला जात होता. पैसे घेतल्यानंतर कोणावरही आरोप लावणे, अशी प्रवृत्ती त्यांच्या वागण्यात दिसून येत असल्याचा आरोप आहे. भीतीच्या वातावरणामुळे लोक त्यांच्या घराजवळ जाणेही टाळत असल्याचे सांगितले जाते.
घरातून वारंवार गायब राहण्याचे दावे
गावातील महिलांचे म्हणणे आहे की अंशिकाची आई आणि मुली अनेकदा सलग काही दिवस घराबाहेर असत आणि नंतर अचानक परत येत. या सततच्या अनुपस्थितीमुळे गावात विविध चर्चा सुरू होत्या आणि कुटुंबावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता.
शिक्षण मर्यादित, पण नेटवर्क प्रचंड
अंशिका केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेऊ शकली, तर तिची मधली बहीण कसाबसा दहावीपर्यंत शिकली आहे. मात्र शिक्षण कमी असले तरी अंशिकाचे नेटवर्क अत्यंत मोठे, प्रभावशाली आणि दूरवर पसरलेले असल्याचे तपासातून समोर येत आहे.
गँगस्टर अॅक्ट लावण्याची तयारी
गोरखपूर पोलीस अंशिका आणि तिच्या सहा सहकाऱ्यांविरोधात गँगस्टर अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हे प्रकरण थार गाडी चोरी आणि बनावट नंबर प्लेट लावण्याशी संबंधित आहे. तपासादरम्यान आढळून आले की संबंधित वाहनावर चार वेगवेगळ्या राज्यांच्या बनावट नंबर प्लेट्स लावण्यात आल्या होत्या.
महागडे शौक ठरले अटक होण्याचं कारण
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अंशिकाची लक्झरी जीवनशैली आणि महागडे शौक तिच्या अटकेसाठी महत्त्वाचा धागा ठरले. दोन आरोपी अटकेत आल्यानंतर अंशिका भूमिगत झाली होती. मात्र आता तिच्या संपूर्ण नेटवर्कच्या एकामागून एक थर उघड होत असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
