भारताने पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवण्याचे ठोस पाऊल उचलले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) दहशतवादविरोधी समितीच्या आगामी बैठकीत भारताकडून जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे ठोस पुरावे सादर केले जाणार आहेत. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांचा थेट सहभाग असल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.
भारताकडून आता पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडाफोड करण्यात येणार आहे. पाकिस्तान अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देत आहे. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे भारताकडून सांगण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने मगरीचे अश्रू ढाळत आपण पीडित असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, पाकड्यांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यात येणार आहे.
advertisement
या यूएन समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वीदेखील पुलवामा आणि उरी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरोधात पुरावे मांडले होते. मात्र या वेळी भारत अधिक आक्रमक आणि पुराव्यांवर आधारित पवित्रा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानला 'टेरर फंडिंग'साठी जबाबदार धरून त्याच्या विरोधात कारवाईची मागणी करताना भारत इतर देशांनाही सहकार्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.
आज DGMO पातळीवर चर्चा
पहलगाम हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये 80 तासांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. मात्र, काही तासांनंतर पाकिस्तानने कराराचे उल्लंघन केले. या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला इशारा दिला. त्याच वेळी, आज दोन्ही देशांमधील डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO)ची चर्चा होईल.
दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिसरात गेल्या काही दिवसांतील तणावानंतर अखेरची रात्र शांततेत गेली. कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. ही शांतता किती काळ टिकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.