नवी दिल्ली: भारतीय लष्कराने इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, लिंक्डइन यांसारख्या सोशल मीडिया अॅप्सच्या वापराबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे नियम गुरुवारी जाहीर करण्यात आले असून याबाबत ANIने वृत्त दिले आहे.
advertisement
या मार्गदर्शक सूचनांनुसार, लष्करातील कर्मचाऱ्यांना इन्स्टाग्रामचा वापर फक्त पाहण्यासाठी आणि निरीक्षणासाठीच करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर कोणतेही टिप्पणी, मतप्रदर्शन किंवा पोस्ट टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.
सोशल मीडिया वापराबाबत लष्कराचे नियम
• यूट्यूब, X, क्वोरा आणि इन्स्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर फक्त माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी पॅसिव्ह वापर (फक्त पाहणे/वाचणे) करण्यास परवानगी आहे.
• या अॅप्सवर स्वतःचे कंटेंट, मेसेज, फोटो, व्हिडीओ किंवा कोणतीही पोस्ट अपलोड करण्यास मनाई करण्यात आली आहे.
• स्काईप, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल यांसारख्या अॅप्सवर फक्त सामान्य स्वरूपाची आणि गोपनीय नसलेली माहिती शेअर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
• या अॅप्सवर संवाद साधताना फक्त ओळखीच्या व्यक्तींशीच संपर्क ठेवावा, तसेच समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे याची खात्री करणे ही पूर्णपणे वापरकर्त्याची जबाबदारी असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
• लिंक्डइनचा वापर फक्त रेझ्युमे अपलोड करण्यासाठी आणि नोकरी देणारे किंवा शोधणारे यांच्याशी संबंधित माहिती मिळवण्यासाठीच करता येईल.
लष्कराच्या या नव्या धोरणाचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा, माहितीची गुप्तता आणि सायबर सुरक्षेला बळकटी देणे हा असल्याचे सांगण्यात येत आहे.
