इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढून पेट्रोल-डिझेल महाग होणार असल्याच्या अफवेने देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये अनेकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
भारताकडे कच्च्या तेलाचा साठा किती?
जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात कच्चे तेल आणि रिफाइंड तेलाचा २५ दिवसांचा साठा आहे. कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजी आयात करण्यासाठी पर्यायी स्रोतांचा शोध सुरू असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्याची कोणतीही तात्काळ योजना नाही, असेही सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
advertisement
...तर तेल किमतीचा भडका उडणार
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी रोखणे किंवा प्रभावीपणे बंद करू शकते, असे सांगितले जाते. पर्शियन आखाताच्या तोंडावर असलेला हा अरुंद जलमार्ग जगातील तब्बल एक चतुर्थांश समुद्री तेल व्यापार हाताळतो. अशावेळी इराणने चीन, युरोप, अमेरिका आणि इतर प्रमुख तेल ग्राहकांना तेल आणि वायू वाहून नेणाऱ्या महाकाय टँकरना प्रवेश नाकारला तर तेलाच्या किमतींचा स्फोट होईल, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता वाढण्याची दाट शक्यता आहे. भारताचे होर्मुझवर अधिक अवलंबित्व आहे. गेल्या महिन्यापर्यंत भारताने २.६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन तेल आयात केले. या आकडेवरून भारताचे होमुर्झवरील अवलंबित्व अधोरेखित होते.
