सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले की, मध्य दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये ट्रुडो यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे पॉली कार्बोनेट प्लास्टिकचा जाड थर असलेल्या बुलेटप्रूफ काचेचे एक अडव्हान्स सुरक्षा कवच बसवण्यात आले होते, ज्यात अगदी स्निपर बुलेट देखील प्रवेश करू शकत नाही. याशिवाय इतर सुरक्षा उपकरणेही सुरक्षित यंत्रणेचा भाग म्हणून या ठिकाणी बसवण्यात आली होती. परंतु ट्रुडो यांच्या शिष्टमंडळाने भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूटमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी त्यांनी सामान्य खोल्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय सुरक्षा अधिकारी चकित झाले. पुढील काही तासांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यादरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यास सहकार्य करून प्रोटोकॉलचे पालन करावे अशी विनंती केली.
advertisement
ट्रुडो यांचा प्रेसिडेंशियल सूटमध्ये राहण्यास नकार
कॅनडाच्या बाजूने सहमती दर्शविण्यास नकार दिल्यानंतर भारतीय सुरक्षा अधिकार्यांना माघार घ्यावी लागली आणि जस्टिन ट्रूडो यांना एका सामान्य खोलीत राहण्याची परवानगी देण्यात आली. कारण अशा प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय हा भेट देणारे मान्यवर आणि त्यांच्या दूतावासावर अवलंबून असतो. नियमित खोल्यांमध्ये राहूनही कॅनेडियन लोकांनी प्रेसिडेंशियल सूटसाठीचे पैसे देखील देऊ केले होते अशीही माहीत समोर आली आहे. ट्रूडो कदाचित त्यांच्या सुरक्षा टीमच्या सूचनांचे पालन करत असावेत आणि त्यांच्या मनात दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे भीती होती असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
G20 शिखर परिषदेनंतर बराच ड्रामा
सुत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर G20 शिखर परिषदेनंतर बराच ड्रामा झाला. ट्रूडो 36 तासांच्या विलंबानंतरच कॅनडाला रवाना झाले. कारण त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची तक्रार आली होती. 10 सप्टेंबर रोजी रात्री ते कॅनडाला रवाना होणार होते, मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते दिल्लीतच अडकले. विमानाच्या उड्डाणपूर्व तपासणीदरम्यान ही समस्या आढळून आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एअरबस विमानाला उड्डाण घेण्यापासून थांबवले.
3 दिवसांनी कॅनडाला झाले रवाना
विमानातील तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर आणि विमान उड्डाणासाठी सज्ज झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी दिल्लीहून कॅनडासाठी रवाना झाले. विशेष म्हणजे जस्टिन ट्रुडो यांच्या विमानात बिघाड होण्याची ही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वी 2016 आणि 2019 मध्येही अशाच घटना घडल्या होत्या. भारताने ट्रुडो यांना कॅनडात परत घेऊन जाण्यासाठी विमान देण्याची ऑफरही दिली होती. परंतु कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी ती ऑफर देखील नाकारली.
