कार्यक्रमात बोलताना मंत्री विजय शाह यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची प्रशंसा केली. ते म्हणाले, "प्रत्येक झोपडीत आणि प्रत्येक डोक्यात हलमा व्हायला हवा, हलमा म्हणजे इतरांसाठी जगणे, समाजासाठी जगणे. जसे आपले मोदीजी समाजासाठी जगत आहेत, समाजासाठी रात्रंदिवस ते काम करत आहेत. ज्यांनी आपल्या लेकींचं कुंकू पुसलं, आपण त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांची लायकी दाखवून दिली. दहशतवाद्यांनी कपडे उतरवायला लावून हिंदू पुरुषांना गोळ्या घातल्या पण बहिणीने त्यांची ऐशीच्या तेसी करण्यासाठी आपल्याकडील विमानं तिकडे पाठवली. मोदी त्यांचे कपडे तर काढू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या समाजाची बहिण त्यांच्याकडे पाठवली, त्यांनी आपल्या बहिणींना विधवा केलं, पण त्यांच्या समाजाच्या बहिणीनं त्यांनाच धडा शिकवला" पुढे त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्य दलाचं यांचं कौतुक केलं. पण, जेव्हा आपल्या विधानामुळे वाद पेटला हे लक्षात आल्यावर दिलगिरीही व्यक्त केली.
advertisement
कुरेशी यांच्याशी संबंध जोडला जातोय
कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमका सिंह यांच्यासोबत "ऑपरेशन सिंदूर" ची माहिती माध्यमांना दिली होती. कर्नल सोफिया कुरेशी सध्या सिग्नल कोअरमध्ये अधिकारी आहेत. पाकिस्तानवर केलेल्या कारवाईच्या माहितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मंत्र्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "ज्यांनी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले, त्यांना आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे. आपल्या बहिणींसोबत जे काही घडले होते, त्याचा बदला त्यांच्याच भाषेत घेतला गेला आहे. माझ्या भाषणाचा वेगळा संदर्भ कोणी काढू नये. जर कोणी वेगळा संदर्भ काढत असेल, तर त्यांना मी सांगू इच्छितो की तो संदर्भ नाही. त्या आपल्या बहिणी आहेत आणि त्यांनी सैन्यासोबत मिळून खूप ताकदीने बदला घेतला आहे."