देशात महिला व मुली अजूनही असुरक्षितच आहेत, हे दररोज सिद्ध होतंय. देशात कुठे ना कुठे महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येतायत. आता आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.
ओडिशातल्या कालाहांडी जिल्ह्यात राहणारी 17 वर्षीय पीडित मुलगी विशाखापट्टणममध्ये एका व्यक्तीकडे कुत्रा सांभाळायचं काम करत होती. 17 डिसेंबरला घरमालक कुटुंबासह बाहेर गेला होता. त्याच दिवशी तिच्या प्रियकराचा वाढदिवस होता. त्याला भेटण्यासाठी ती आरके बीचला गेली. तिथे प्रियकराचा एक मित्रही होता. त्या दोघांनी तिला एका लॉजमध्ये नेलं व तिच्यावर बलात्कार केला. या धक्क्यामुळे हादरलेल्या पीडितेनं पुन्हा बीचवर येऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. तिथे एका फोटोग्राफरने तिला पाहिलं व तिला मदत देऊ केली. तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याच्या 10 मित्रांसह त्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी तिच्या तोंडात त्यांनी बोळे कोंबले होते. 2 दिवस हे सत्र सुरू होतं. अखेर प्रयत्न करून ती त्यांच्या तावडीतून निसटली व ओडिशातल्या तिच्या गावी गेली.
advertisement
मानसिक धक्क्यामुळे ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत गप्प होती. कुटुंबीयांना तिने जेव्हा घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्याआधी 17 तारखेपासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. ती सापडल्यावर तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आयपीसी कलम 363, 376 डी, 342 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्या. विशाखापट्टणम आणि झारखंडमध्ये काही ठिकाणी पोलीस त्याकरिता छापे टाकत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 11 आरोपींना अटक केलीय. इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला असून, तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलीय.
आंध्र प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा वासिरेड्डी पद्मा यांनी विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त रविशंकर यांना पत्र पाठवून घटनेची माहिती द्यावी असं सांगितलंय. या घटनेतल्या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी महिला संघटनांनी केली आहे.