अशात नागपूरमधील एक महिला १४ मे रोजी लडाखच्या कारगिलमधील शेवटच्या गावातून गूढ पद्धतीने गायब झाली आहे. ती आपल्या १५ वर्षांच्या मुलासोबत लडाख फिरायला आली होती. ती आपल्या मुलासोबत एका हॉटेलमध्ये वास्तव्याला होती. १४ तारखेला ती आपल्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून कारगिलच्या शेवटच्या गावाला भेट द्यायला गेली. इथून ती अचानक गायब झाली आहे. नागपूरची एक महिला अशाप्रकारे बॉर्डरवरून बेपत्ता झाल्याने विविध संशय व्यक्त केला जातोय.
advertisement
कारगिलचे एएसपी नितीन यादव यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "संबंधित महिला ९ मे रोजी कारगिलमध्ये आली होती. ती तिच्या १५ वर्षांच्या मुलासह एका हॉटेलमध्ये थांबली होती. १४ मे रोजी ती आपल्या मुलाला हॉटेलमध्ये सोडून हुंडरबन गावात गेली. हे गाव कारगिलमधील शेवटचं गाव असून इथून नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ आहे. याच गावातून संबंधित महिला गायब झाली."
१४ तारखेला रात्री हॉटेल कर्मचाऱ्यांना जेव्हा ती महिला दिसली नाही, तेव्हा ही घटना उघडकीस आली, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं. त्यांनी मुलाकडे चौकशी केली असता, आम्ही गेल्या काही दिवसांपासून बॉर्डरवरील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतो, अशी माहिती त्याने दिली. तसेच कारगिलमध्ये येण्यापूर्वी आम्ही दोघं पंजाबमधील काही ठिकाणी फिरलो, असं देखील मुलाने पोलिसांना सांगितलं.
संबंधित महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक विशेष शोध पथक तयार केलं आहे. पण आतापर्यंत पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलीस महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहेत, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. महिलेसोबत बॉर्डरवर काही घातपात घडला का? की ती गुप्तहेर होती? असा संशयही व्यक्त केला जात आहे.