यामध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी, शहरी उपजीविका, विज्ञान आणि नवोन्मेष, नागरिक-केंद्रित सेवा आणि प्रगत आरोग्यसेवा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश असून समावेशक वाढ, तांत्रिक प्रगती आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा यांना सातत्याने असलेले पंतप्रधानांचे प्राधान्य त्यातून दिसून येते
रेल्वे वाहतूक सुविधेत मोठी वाढ करणाऱ्या चार नवीन रेल्वे सेवांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ करण्यात येणार असून त्यामध्ये तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या आणि एका प्रवासी गाडीचा समावेश आहे. यामध्ये नागरकोइल-मंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम-तांबरम अमृत भारत एक्सप्रेस, तिरुवअनंतपुरम-चार्लापल्ली अमृत भारत एक्सप्रेस आणि त्रिशूर आणि गुरुवायूर दरम्यानच्या नवीन प्रवासी गाडीचा समावेश आहे. या सेवा सुरू झाल्यामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यासारख्या लांब पल्ल्याचा प्रवास लक्षणीयरीत्या सुकर होईल,तसेच प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल, या नवीन गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक परवडणारा, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा प्रवास होईल. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे या प्रदेशातील पर्यटन, व्यापार, शिक्षण, रोजगार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला मोठ्या प्रमाणात गती मिळेल.
advertisement
शहरी उपजीविकेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पंतप्रधान 'पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड' चा प्रारंभ करतील. हा उपक्रम फेरीवाल्यांच्या आर्थिक समावेशाच्या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ असणार आहे. ही यूपीआयशी जोडलेली आणि व्याजमुक्त फिरती कर्ज सुविधा असून, यामुळे तातडीने वित्तीय तरलता उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळेल आणि लाभार्थ्यांना त्यांचा एक औपचारिक पत इतिहास तयार करण्यालाही यामुळे मदत मिळणार आहे. यासोबतच पंतप्रधान केरळमधील फेरीवाल्यांसह 1,00,000 लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्जाचे वितरण करणार आहेत. ही योजना 2020 मध्ये सुरू झाली होती, त्यावेळेपासून, पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून, मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना पहिल्यांदाच औपचारिक पत पुरवठ्याची सोय उपलब्ध झाली आहे. या योजनेने अनौपचारिक क्षेत्रातील- शहरी कामगारांमधील गरिबीचे निर्मूलन आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
विज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्राअंतर्गत, पंतप्रधान तिरुवनंतपुरममध्ये 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गतच्या - राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या ( सीएसआयआर -एनआयआयएसटी) नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्राची पायाभरणी करतील. हे केंद्राअंतर्गत प्रामुख्याने जीवन विज्ञान आणि जैव अर्थव्यवस्थेवर भर दिला जाणार आहे. आयुर्वेदासारख्या पारंपरिक ज्ञान व्यवस्थेला आधुनिक जैवतंत्रज्ञान, शाश्वत पॅकेजिंग आणि हरित हायड्रोजन सोबत जोडण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. तसेच या केंद्राच्या माध्यमातून स्टार्टअपची उभारणी, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहनही दिले जाणार आहे. संशोधनाचे रूपांतर बाजारपेठेसाठी सज्ज असलेल्या उपाययोजनांमध्ये आणि उद्योगांमध्ये करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण हा पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा आणखी एक मुख्य विषय आहे. या अनुषंगाने पंतप्रधान तिरुवनंतपुरममधील श्रीचित्रा तिरुनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेत एका अत्याधुनिक रेडिओसर्जरी केंद्राची पायाभरणी करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मेंदूच्या गुंतागुंतीच्या आजारांवर अत्यंत अचूक आणि कमीत कमी छेद कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया यांसारख्या उपचारांची सोय उलब्ध होणार आहे. यामुळे प्रादेशिक स्तरावरील आरोग्य सेवांच्या क्षमता वाढू शकणार आहेत.
आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान तिरुवनंतपुरममधील नवीन पूजापुरा या मुख्य टपाल कार्यालयाचे उद्घाटनही करतील. हे टपाल कार्यालय आधुनिक आणि तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहे, इथे टपाल, बँकिंग, विमा आणि डिजिटल सेवा अशा सर्वसमावेशक सेवा उपलब्ध असणार आहेत. यामुळे नागरिक केंद्री सेवा वितरण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
