नीतीश कुमार यांनी राज्यसभेवर जावे, असे जदयू आणि भारतीय जनता पक्षातील एका गटाला वाटते. राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नीतीश कुमार यांनी दिल्लीत जावे, यासाठी पडद्याआडून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक
जदयूच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज नीतीश कुमार यांची पाटण्यात भेट घेतली. नीतीश कुमार गुरूवारी आपला नामांकन अर्ज दाखल करतील, असे कळते. नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचेही कळते.
advertisement
भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार
जर नीतीश कुमार राज्यसभेत गेले तर बिहारची सूत्रे कुणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार नीतीश यांनी दिल्लीत जाण्याला सहमती दर्शवली आणि केंद्रात मोठे पद घेतले तर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगेल. महागठबंधनमध्ये संख्याबळाच्या हिशेबाने भारतीय जनता पक्ष सध्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्वाभाविक मुख्यमंत्रिपदावर ते दावा सांगू शकतात.
नीतीश कुमार यांची राजकीय कारकीर्द
नीतीश कुमार यांनी जवळपास नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. २०१४-२०१५ वगळता २००५ सालापासून नीतीश कुमार यांनी बिहारचे नेतृत्व केले आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांचे नेतृत्व घडले. १९८५ साली त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रेल्वे, कृषी अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. कधी भाजप तर कधी लालूंच्या सोबतीने त्यांनी सरकार चालवले. सतत भूमिका बदलल्याने त्यांच्या नावामागे पलटूराम असे टीकात्मक विशेषण लागले.
