हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी आतापर्यंत भारताची हेरगिरी करणाऱ्या एकूण 6 लोकांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला यूट्यूबर आणि इतर लोक पाकिस्तानच्या इंटर-सर््हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या संपर्कात होते. यापूर्वी हरियाणा पोलिसांनी कैथल येथून 25 वर्षीय देवेंद्र, पानीपत येथून एक मुस्लिम युवक आणि नूह येथून एका व्यक्तीला अटक केली होती. आता महिला यूट्यूबरला पानीपत येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. याशिवाय पंजाबमधील मालेरकोटला आणि बठिंडा येथूनही हेरगिरीच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
हिसारची रहिवासी असलेल्या ज्योती मल्होत्राच्या इंस्टाग्रामवर 1 लाख 31 हजार फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर ज्योतीने गेल्या वर्षी पाकिस्तान भेटीचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. याशिवाय तिने दुबईसह इतर देशांमध्येही प्रवास केला आहे. ज्योतीच्या प्रोफाइलनुसार तिने कुरुक्षेत्र विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
एफआयआरमध्ये काय?
पोलिसांनी हिसार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. चौकशीदरम्यान महिला ज्योती मल्होत्राने सांगितले की, 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची एहसान-उर-रहीम उर्फ दानिश नावाच्या व्यक्तीशी भेट झाली.
पाकिस्तानी नागरिकाने केली राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था
या भेटीदरम्यान एहसान-उर-रहीम उर्फ दानिशने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने दोन वेळा पाकिस्तानचा दौरा केला आहे आणि एहसान-उर-रहीमच्या ओळखीचा अली नावाच्या व्यक्तीनेच पाकिस्तानमध्ये तिच्या फिरण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली होती. अलीने तिची पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली होती. त्यानंतर ती शाकिर आणि राणा शहबाज यांनाही भेटली होती. जेव्हा ती भारतात परतली तेव्हा व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमातून ती त्यांच्या संपर्कात राहिली. या काळात ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशलाही अनेक वेळा भेटली.
ज्योतीने सांगितले की, ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली 13 मे रोजी दानिशला भारत सोडण्याचे आदेश दिले होते. आता ज्योती जी न्यू अग्रसेन एक्सटेंशन, हिसारची रहिवासी आहे. तिला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 152 आणि ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट 1923 च्या कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.