अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा
वनतारामध्ये जगातील अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. येथे MRI, CT स्कॅन आणि ICU सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. पंतप्रधानांनी येथे चालणाऱ्या विविध उपचार पद्धतींचे निरीक्षण केले. त्यांनी एशियाटिक सिंहाच्या MRI तपासणीला उपस्थिती लावली तसेच महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या बिबट्याच्या शस्त्रक्रियेचे साक्षीदार झाले.
दुर्मीळ प्राण्यांशी संवाद
मोदींनी केंद्रातील काही दुर्मिळ प्राण्यांसोबत संवाद साधला. त्यांनी एशियाटिक सिंहाचे पिल्लू, दुर्मीळ क्लाऊडेड बिबट्याचे पिल्लू आणि वनतारामध्येच जन्मलेल्या पांढऱ्या सिंहाच्या पिल्लाला खाऊ घातले. याशिवाय, वंतारामधील कराकल (Caracal) जातीच्या दुर्मीळ प्रजातीच्या प्राण्यांच्या प्रजनन कार्यक्रमाविषयी माहिती घेतली.
advertisement
नैसर्गिक अधिवासाची पुनर्रचना
वनताराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवासाची पुनर्रचना करण्यात आली आहे. येथे सोन्या वाघांपासून हिम बिबट्यांपर्यंत अनेक दुर्मिळ प्राणी आहेत. मोदींनी झेब्रासोबत फेरफटका मारला, जिराफांना खाऊ घातले तसेच गेंडा पिल्लू आणि ऑकापी यांना जवळून पाहिले. केंद्रात दोन डोक्यांचा साप, दोन डोक्याचा कासव आणि सोनेरी वाघ देखील आहेत.
हत्तींसाठी विशेष सुविधा
वनतारामध्ये हत्तींसाठी जगातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे हत्तींसाठी हायड्रोथेरपी पूल आहे, जो सांधेदुखी आणि पायांच्या समस्यांवर उपचारासाठी वापरण्यात येतो. मोदींनी येथे वावरणाऱ्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते याविषयी माहिती घेतली.
टीमशी संवाद
पंतप्रधानांनी वनतारातील पशुवैद्यकीय डॉक्टर, कर्मचारी आणि कामगारांशी संवाद साधला. त्यांनी वनताराच्या समर्पित टीमचे कौतुक केले आणि वन्यजीव संरक्षणासाठी त्यांच्या प्रयत्नांना सलाम केला.
वनताराच्या भेटीने भारताच्या वन्यजीव संरक्षणातील महत्त्वाचे पाऊल अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे देशभरातील नागरिकांमध्ये वन्यजीव संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. वंतरासारख्या प्रकल्पांनी भारताच्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.