पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत कोरोना काळात भारताने केलेल्या कामगिरीचाही उल्लेख केला. कोरोना काळात गरीब लोकांची काळजी भारताने घेतली. १५० हून जास्त देशांना आपण कोरोना लस आणि औषधे दिली. ९ वर्षांपासून एका धोरणावर सरकार चालत आहे. सबका साथ, सबका विकास हेच आमचं धोरण आहे आणि जगानेही हे स्वीकारलंय. जगाला देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे. जी२० अध्यक्ष म्हणून बायो फ्यूल एलायन्स सुरू करत आहे. बायो फ्यूल एलायन्समुळे अर्थव्यवस्था आणखी भक्कम होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
advertisement
कोरोनामुळे निर्माण झालेली संघर्षाची स्थिती आणि या पार्श्वभूमीवर भारताकडे जी२० परिषदेचं अध्यक्षपद आलं आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाने जगाला अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या युगात ढकललंय. मात्र गेल्या काही वर्षात जगाचे भारताच्या प्रगतीकडे लक्ष आहे. आर्थिक सुधारणा, बँकिंग सुधारणा, सामाजिक क्षेत्रातली क्षमता, स्वच्छता याशिवाय मूलभूत गरजा अन् पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक याचं स्वागत जगभरातून झालं. जागतिक गुंतवणूकदारही एफडीआयमध्ये गुंतवणूक करत भारतावर विश्वास दाखवत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने गेल्या ९ वर्षात वेगवेगळ्या उपक्रमातून विविध देशांना एकत्र आणण्यास इच्छुक असल्याचं दाखवून दिलं. भारताच्या कामगिरीमुळे जगात देशाच्या क्षमतावर विश्वास बसला आणि भारताकडे जी२० चे अध्यक्षपद आले असंही मोदींनी सांगितलं. जी२० साठी भारताने जेव्हा अजेंडा मांडला तेव्हा त्याचे स्वागत झाले. आपण जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सक्रीय आणि सकारात्मक दृष्टीकोन आणू शकतो हे जगाला माहिती होतं. जी२० अध्यक्ष म्हणून एक बायो फ्यूल एलायन्स सुरू करत असून त्यामुळे देशांना त्यांच्या उर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करेल.
जगभरातील नेते भेटतात तेव्हा ते भारताबद्दल सकारात्मक बोलत असतात असंही मोदींनी सांगितलं. देशातील १४० कोटी नागरिकांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामामुळे, प्रयत्नामुळे जागतिक नेते हे आशावादाने भरलेले असतात. भारताकडे देण्यासारखं खूप काही आहे याची त्यांना खात्री आहे. जागतिक भविष्य घडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असंही त्यांना वाटतं. जी२०च्या व्यासपीठावर आपल्या कार्याला जागतिक नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या समर्थनातही त्यांचा भारतावर असलेला विश्वास दिसून येतो असं मोदींनी सांगितले.
